ITI पास तरुणाचा शेतीत अभिनव प्रयोग ! 15 हजार रुपयांच्या खर्चात मिळवले 2 लाखाचे उत्पन्न, वांग्याच्या शेतीने 2 महिन्यात बनवले मालामाल
Maharashtra Successful Farmer : मराठवाडा म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यापुढे उभे राहत ते भयान दुष्काळाचे चित्र. गेली तीन वर्ष जरूर मराठवाड्यात चांगला पाऊस आला आहे. मात्र तीनवर्षा आधी मराठवाड्यात कमी पावसामुळे सततची नापिकीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत होता.
यावर्षी देखील मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट पाहायला मिळत आहे. आधीच कमी उत्पादनामुळे आणि उत्पादित झालेल्या मालाला बाजारात अपेक्षित असा दर मिळत नसल्याने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना दुष्काळ आणखी बेजार करणार आहे.
मराठवाड्यात दुष्काळामुळे सर्वत्र त्राहीमाम माजला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात खूपच कमी पाऊस झाला असल्याने या विभागात आगामी काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न ऐरणीवर येणार आहे.
गुराढोरांचा चाऱ्याचा प्रश्न देखील बिकट होईल, अशी भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अशा या विपरीत परिस्थितीमध्ये मात्र मराठवाड्यातील नांदेडच्या एका प्रयोगशील तरुण शेतकऱ्याने वांग्याच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
खरंतर नांदेड जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आता पारंपारिक पिकांच्या शेती सोबतच फळ पिकांची आणि भाजीपाला पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले आहेत.
विशेष म्हणजे फळबागा आणि भाजीपाला पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.नांदेडच्या बेटक बिलोली येथील सतीश पवार या तरुण शेतकऱ्याने देखील भाजीपाला लागवडीतून लाखोंचे उत्पन्न कमवून दाखवले आहे.
आयटीआय पर्यंत शिक्षण घेतलेल्या सतीशने नोकरी ऐवजी शेती व्यवसायाची कास धरली आहे.विशेष म्हणजे शेतीमध्ये त्याला आता चांगली कमाई देखील होऊ लागली आहे. यामुळे कंपनीत कामाला जाण्यापेक्षा शेती करण्याचा त्याचा हा निर्णय त्याच्यासाठी फायदेशीर ठरला आहे.
सतीशने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी त्याने 15 गुंठ्यात वांग्याची लागवड केली आहे.या 15 गुंठ्यात वांग्याची लागवड करण्यासाठी त्याला 15,000 चा खर्च आला आहे. विशेष म्हणजे दोन महिन्याच्या काळातच या पिकातून त्याने सव्वा लाखाची कमाई केली आहे.
म्हणजे खर्च वजा जाता त्याला एक लाख रुपयांचा निव्वळ नफा राहिला आहे.तसेच वांग्याच्या पिकातून आणखी एका लाखापर्यंतची कमाई होईल असा त्याला विश्वास आहे.
म्हणजेच 15 गुंठे वांग्याच्या शेतीतून त्याला जवळपास दोन लाखांपर्यंतची कमाई होणार आहे. एकंदरीत, आयटीआय केल्यानंतर सतीश याने कंपनीत काम करण्याऐवजी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला आज या निर्णयाचा फायदा होत आहे.