केंद्रीय अमली पदार्थ विरोधी विभागाच्या (NCB) मुंबई विभागीय संचालकपदी अमित गवाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पदावरून समीर वानखेडे यांच्या बदलीनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. गवाटे यांनीही मुंबई एनसीबीत वानखेडे यांच्यासोबत काही काळ काम केले आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणात अटक केल्यानंतर वानखेडे चर्चेत आले होते. त्यावरून मंत्री नवाब मलिक आणि वानखेडे कुटुंबात मोठा कायदेशीर वादही झाला, तो अद्याप सुरूच आहे.

जातीचे प्रमाणपत्र, बिअरबार वगैरे मुद्द्यांवरून हा वाद सुरू आहे. ३१ डिसेंबरपासून वानखेडे यांची येथून बदली करण्यात आली होती.

आता त्यांच्या जागी गवाटे यांची नियुक्ती झाली आहे. गवाटे पूर्वी काही दिवस मुंबई एनसीबीमध्ये कार्यरत होते. बेंगलुरू आणि चेन्नई एनसीबीनंतर आता गवाटे हे पुन्हा मुंबई एनसीबीमध्ये आले आहेत. येथे सुरू असलेला अनेक हायप्रोफाईल प्रकरणे आता त्यांना पहावी लागणार आहेत.