मुंबई : अभिनेत्री कंगना राणौतचा ‘लॉकअप’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये स्पर्धक टिकून राहण्यासाठी रोज वेगवेगळे खुलासे करताना दिसत आहेत. याचदरम्यान मंदाना करीमीने झिशान खानसोबत बोलताना अभिनेता करणवीर बोहराबाबत धक्कादायक खुलासा केला होता. यामुळे सध्या या एपिसोडची सगळीकडे खळबळ माजली आहे.

झीशान खानने त्याच्या सहकारी स्पर्धक अंजली अरोरा आणि अली मर्चंटला त्याच्या आणि मंदानाच्या संभाषणाबद्दल सांगितले. तो म्हणाला की, “मंदानाने केव्हीबद्दल खूप मोठी गोष्ट सांगितली. ती करणवीरवर टीका करत होती आणि तिने मला सांगितले की तिचा केव्हीवर अजिबात विश्वास नाही.”

मंदाना करीमीबद्दल बोलताना झीशान खान पुढे म्हणाला, “मंदनाने मला सांगितले की, त्याने तिला स्क्रिप्टवर घरी चर्चा करण्यासाठी अनेकदा बोलावले आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे.” झीशानचे हे शब्द ऐकून अली मर्चंट आणि अंजली अरोरा यांनाही आश्चर्य वाटते. यावर अंजली अरोरा म्हणते, “यामुळे माझाही त्याच्यावर विश्वास नाही. शोच्या दुसऱ्याच दिवशी त्याने माझ्यासोबत अशा गोष्टी करायला सुरुवात केली.” असं अंजली म्हणाली. दरम्यान, मंदानाच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.