मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतचा ‘लॉक अप’ हा रियालिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. शोमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील खुलासे टीव्हीवर सांगत आहेत. यामुळे हा शो प्रेक्षकांनाही खूप आवडतं आहे. दरम्यान, आता प्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगीने ती काळी जादू करायची असा धक्कादायक खुलासा नुकताच शोमध्ये केला आहे. या एपिसोडची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा होत आहे.

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये या शोची सदस्य अभिनेत्री पायल रोहतगीनं स्वतःबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. पायल म्हणाली, ‘मी अभिनय क्षेत्रात आल्यानंतर करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी वशीकरणाची मदत घेतली होती. दिल्लीमध्ये मला एका व्यक्तीनं सांगितलं होतं की तू ज्याच्याबद्दल विचार करते त्याची कोणतीही वस्तू मला आणून दे मी गंगा तटावर पूजा करेन आणि जेव्हा मी हे करेन तेव्हा तू त्या व्यक्तीबद्दल विचार कर.’

दरम्यान, यावर पायलनं स्पष्टीकरण दिलं की यातल्या कोणत्याच गोष्टीचा तिला फायदा झाला नाही. मात्र हे कोणाला सांगितल्यावर लोक खिल्ली उडवतील याची तिला भीती असल्याचं तिनं म्हटलं. यावर कंगना तिला म्हणाली, ‘पायल तुला माहिती आहे का तू जे केलं आहे त्याला काळी जादू म्हणतात. तू काळी जादू करून लोकांकडे काम मागण्याचा प्रयत्न केला होतास का? तू एवढी सुंदर आहेस. टॅलेंटेड आहेस. तुझ्या कामातूनच तू लोकांना आकर्षित करू शकतेस. तुला कोणत्याची मांत्रिकाची गरज नाही. या अशा गोष्टींच्या नंतर खूप चर्चा होतात.’ असं कंगना म्हणाली.