मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून स्वतः ची वेगळी अशी ओळख निर्माण करणारा विनोदाचा बादशाह कुशल बद्रिकेचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कुशल आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात राहत असतो. दरम्यान, नुकतंच कुशल बद्रिकेने होळी आणि धुलिवंदनाच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आली आहे.
कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात कुशल बद्रिकेने त्यांनी काल धुळवड कशी साजरी केली हे दाखवले आहे. व्हिडिओमध्ये तो, त्याची पत्नी आणि इतर सर्वजण छान धुळवड खेळताना दिसत आहेत. यात ते फार उत्साहात होळी खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी ते विविध गाण्यांवर डान्स करतानाही दिसत आहे.
या व्हिडीओला कुशलने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. “मला चित्र काढायला कधीच आली नाहीत, पण नात्यांमध्ये रंग भरता आली, त्यामुळे आयुष्याचं चित्र मात्र छान जमलं. आयुष्य सुंदर आहे, ते ह्याच रंगांमुळे. रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा”, असे कुशलने या व्हिडीओला सुंदर असे कॅप्शन दिले आहे.
कुशल बद्रिकेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकजण लाईक्स आणि कमेंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या त्याची ही पोस्ट आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.