मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ या शो मधील प्रसिद्ध विनोदी अभिनेता कुशल बद्रिके अल्पावधीतच महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. कुशल अनेकदा त्याच्या आगामी नाटकांची, चित्रपटांची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. नुकतंच एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेता कुशल बद्रिकेने सिद्धार्थ जाधवची एक भावूक आठवण सांगितली आहे.
नुकतंच झी मराठी वाहिनीवर ‘फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२१’ या पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात ‘धुरळा’ चित्रपटासाठी सिद्धार्थ जाधवला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार अभिनेत्री स्मिता जयकर आणि कुशल बद्रिकेच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सिद्धार्थ हा पुरस्कार स्वीकारत असताना कुशल बद्रिकेने त्याची एक जुनी आठवण सांगितली.
कुशल म्हणाला, “मी जेव्हा सिनेसृष्टीत आलो तेव्हा त्याने मला मोलाची संधी मिळवून दिली होती. एकदा एका स्पर्धेत अचानक सिद्धू हे छोटं मोठं काम करत होतो. तेव्हा मी रंगभूमीवर काम करत होतो. त्यावेळी सिद्धार्थची एन्ट्री झाली होती. सिद्धार्थची एन्ट्री झाली तेव्हा मी म्हटलं होतं की हे साले कमर्शियल आर्टिस्ट येतात आणि बक्षिसं घेऊन जातात आणि त्यानंतर कसं कोण जाणे त्या स्पर्धेत सिद्धार्थचा द्वितीय क्रमांक आला होता आणि प्रथम क्रमांक माझा आला होता.”
पुढे कुशल म्हणाला, “तेव्हा सिद्धार्थने नाटकामध्ये काम करशील का? असे विचारलं होतं. यानंतर माझं राम भरोसे हे पहिलं कमर्शिअल नाटक आलं होतं. तिथून माझा प्रवास सुरु झाला. आज या रंगमंचावर सिध्दार्थचा पहिला नंबर आला आणि ते चक्र आज पूर्ण झालं.” यादरम्यान हे सर्व बोलताना कुशल भावूक झाला. त्याला आपले अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.