नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज केएल राहुलने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर स्वतःला कर्णधारपद मिळाल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अचानक अशाप्रकारे कर्णधारपदाची संधी मिळेल, अशी अजिबात अपेक्षा नव्हती, असे त्याने म्हटले आहे. केएल राहुलच्या मते, हे त्याच्यासाठी सरप्राईज होते.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार होता. मात्र, दुखापतीमुळे तो बाहेर गेला आणि त्यानंतर केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. राहुलच्या म्हणण्यानुसार, तो स्वत:ला इतक्या लवकर कर्णधार बनेल अशी अपेक्षा नव्हती.
तो म्हणाले, हे खूप मोठे आश्चर्य होते. मी उपकर्णधार होतो आणि जेव्हा तुम्ही उपकर्णधार असता तेव्हा हळूहळू स्वत:ला कर्णधारपदासाठी तयार करता. पण अशी परिस्थिती होईल आणि मला अचानक कर्णधारपद मिळेल, याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. सामन्याच्या दिवशी सकाळी विराट कोहलीने पाठीच्या दुखापतीची तक्रार माझ्याकडे केली आणि त्यामुळे तुला संघाचे नेतृत्व करावे लागेल असे म्हंटले.
केएल राहुलच्या एकूण कर्णधारपदाबद्दल बोललो तर ते फारसे चांगले राहिले नाही. राहुलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून खराब सुरुवात झाली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कर्णधारपद भूषवले, ज्यात संघाचा पराभव झाला. यानंतर कर्णधार म्हणून तीन एकदिवसीय सामन्यांमध्येही त्याला पराभव पत्करावा लागला. याशिवाय इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याच्या नेतृत्वाखाली संघाला फारसे यश मिळवता आले नाही. आयपीएलच्या आगामी मोसमात तो लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.