मुंबई : सुपरस्टार यशचा ‘KGF Chapter 2’ आज 14 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट रिलीज करण्यापूर्वी KGF च्या निर्मात्यांनी एक असं पाऊल उचलले आहे की ज्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी साऊथ सुपरस्टार पुनीत राजकुमारला विशेष श्रद्धांजली अर्पण करून चित्रपटाची सुरुवात केली. यामुळे पुनीतचे सर्व चाहतेही भावूक झाले आहेत.

‘KGF Chapter 2’ ची सुरुवातच दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमारच्या फोटोंनी झाली. स्पेशल थँक्स सेगमेंटमध्ये पुनीत राजकुमारचे लहानपणापासून ते शेवटपर्यंतचे फोटो दाखवले गेले होते आणि ‘जोपर्यंत आम्ही तुम्हाला पुन्हा भेटू तोपर्यंत आम्ही तुम्हाला मिस करू’ असे या फोटोंसह लिहिले होते. एका ट्विटर युजरने थिएटरमधील हा फोटो शेअर केला आहे. हे पाहून सगळेजण निर्मात्यांचे कौतुक करत आहेत. तसेच, पुनीत यांच्या आठवणीत भावूकही झाले आहेत.

सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे 29 ऑक्टोबर 2019 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यावेळी ते 46 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्र, चाहते आणि संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. यावर्षी त्याचा शेवटचा चित्रपट ‘जेम्स’ मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.