हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार यश याच्या आगामी KGF Chapter-2 चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर आता चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे, ती म्हणजे चित्रपटातील ‘तुफान’ हे पहिले गाणे रिलीज झाले आहे.

‘तुफान’ हे गाणं MRT MUSIC च्या YouTube चॅनलवर शेअर करण्यात आले आहे. अवघ्या 1 तासापूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला आतापर्यंत 5 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटात रॉकिंग स्टार यश व्यतिरिक्त संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी, रवीना टंडन आणि प्रकाश राज यांसारखे अनेक दिग्गज आणि दमदार कलाकार दिसणार आहेत. या गाण्यातील दमदार अंदाज आणि काही तरी धमाकेदार होण्याची चाहूल प्रेक्षकांना अजून उत्सुक करत आहे.

‘KGF Chapter 2’ हा 2018मध्ये आलेल्या ‘KGF’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. मागच्या चित्रपटात यशच्या रॉकी भाई या पात्राची थेट गरुडाशी लढाई दाखवण्यात आली होती. आता नव्या चित्रपटात तो अधीराशी स्पर्धा करणार आहे, जी खूपच धोकादायक आहे. ही स्पर्धा येत्या 14 एप्रिल 2022 ला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच, हा चित्रपट कन्नड, तेलुगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.