मुंबई : बॉलिवूड चित्रपट कलाकार कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नानंतरची पहिली होळी अगदी साध्या आणि रंगीबेरंगी पद्धतीने घरात साजरी केली. अभिनेत्री कतरिना कैफने सोशल मीडियावर फोटो शेअर करून याची झलक दिली आहे. या फोटोंमध्ये कतरिना तिच्या सासू-सासऱ्यांसोबत होळीच्या रंगात रंगलेली दिसत आहे|

कतरिनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये कौशल कुटुंब पहिली होळी एकत्र खूप आनंदात साजरी करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये विकी कौशलही त्याची आई आणि पत्नी कतरिना कैफसोबत पोज देताना दिसत आहे. कतरिना कैफने हे फोटो शेअर करून लग्नानंतरच्या पहिल्या होळीची झलक दाखवली आहे.

दरम्यान, विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे गेल्या वर्षी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न झाले होते. त्यांचा विवाह उदयपूरच्या सिक्स सेन्सेस हॉटेलमध्ये मोठ्या थाटात पार पडला होता. कतरिना कैफही सोशल मीडियाच्या माध्यमातून विकी कौशलसोबतच्या लग्नानंतरच्या आयुष्याची झलक चाहत्यांना दाखवत असते.