मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती दर्शवली जात आहे. अनेकजण चित्रपटासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत हिनेही या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना कंगना म्हणाली, ‘खूपच उत्तम चित्रपट आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन. आज त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीची पापं धुवून टाकली. सगळ्या बॉलिवूडकरांची पापं धुतली गेली एवढा चांगला चित्रपट तयार केला. हा चित्रपट खरंच कौतुकास्पद आहे. त्यामुळे अजूनही जे कलाकार लपून बसले आहेत त्यांनी समोर येऊन चित्रपटाचं कौतुक करायला हवं, प्रमोशन करायला हवं. चांगल्या कथा नसलेल्या चित्रपटांना प्रमोट करता मग चांगली कथा असलेला चित्रपट तर नक्कीच प्रमोट करू शकता.’ अश्या शब्दात कंगणाने चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

मागच्या काही दिवसांपासून कंगना सातत्यानं ‘द काश्मीर फाइल्स’वर काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देत ती अनेक गोष्टींवर वादग्रस्त भाष्य देखील करत आहे. दरम्यान, चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.