मोठी बातमी ! एका दिवसातच कांद्याच्या दरात 1 हजाराची घसरण, आज कांद्याला काय भाव मिळाला ? वाचा सविस्तर
Kanda Bajarbhav Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर चांगलेच कडाडले आहेत. साधारणता एका महिन्याभरापूर्वी भारतात टोमॅटोच्या बाजारभावात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. टोमॅटोचे भाव ऐतिहासिक पातळीवर पोहोचले होते.
किरकोळ बाजारात 100 रुपये प्रति किलोच्या दरात टोमॅटोची विक्री होत होती. काही ठिकाणी तरी याहीपेक्षा अधिक दर टोमॅटोला मिळाला होता. पण यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे बजेट बिघडले होते.
परिणामी शासनाविरोधात नाराजी वाढली होती. आता गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात मंदी आहे. पण अशातच कांद्याचे बाजारभाव कडाडले आहेत. किरकोळ बाजारात कांदा 80 रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचला आहे. काही ठिकाणी याहीपेक्षा अधिक दर मिळत आहे.
विशेष म्हणजे केंद्र शासनाने जर काही उपाययोजना केल्या नाहीत तर कांदा किरकोळ बाजारात लवकरच शंभरी पार करणार अशी शक्यता वर्तवली जात होती. निश्चितच निवडणुकीच्या काळात सरकारसाठी ही एक डोकेदुखी ठरणार होती.
दरम्यान किरकोळ बाजारात कांद्याच्या वाढलेल्या या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून आता वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. केंद्र सरकारने आता बफर स्टॉकमधील कांदा किरकोळ बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
बफर स्टॉक मधील हा कांदा पंचवीस रुपये प्रति किलो याप्रमाणे ग्राहकांना विक्री होणार आहे. यामुळे देशांतर्गत कांद्याची उपलब्धता वाढेल आणि नागरिकांना कमी दरात कांदा उपलब्ध होऊ अशी शक्यता आहे.
साहजिकच याचा शेतकऱ्यांना मात्र फटका बसणार आहे. विशेष म्हणजे कांद्याचे किमान निर्यात मूल्य देखील सरकारने वाढवले आहे. आता 800 डॉलर प्रति टन एवढे कांद्यासाठी किमान निर्यात मूल्य निर्धारित करण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणून कांद्याच्या घाऊक बाजारातील किमती झपाट्याने कमी होऊ लागल्या आहेत.
आज राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या कमाल दरात तब्बल 1000 रुपयाची घसरण झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात येणार की काय अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.
आज कांद्याला काय भाव मिळाला
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, काल सोलापूर एपीएमसी मध्ये कांद्याची 37 हजार 276 क्विंटल आवक झाली होती. कालच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 500, कमाल 7000 आणि सरासरी 3700 एवढा भाव मिळाला होता.
मात्र आज या मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी झाली. या मार्केटमध्ये आज 30 हजार 277 क्विंटल कांदा आवक झाली आणि कांद्याला किमान 500, कमाल 6000 आणि सरासरी 3000 एवढा भाव मिळाला. याचा अर्थ एका दिवसातच कांद्याच्या कमाल बाजारभावात एक हजार रुपये आणि सरासरी बाजारभावात सातशे रुपयांची घसरण झाली आहे.