मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे भाव वाढतच चालले आहेत. यामुळे सामान्य लोकांना वाढत्या महागाईचा जोरदार फटका बसत आहे. असं असतानाच राजस्थानमधील मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे या वाढत्या भावांसंदर्भात एक मागणी केली आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना प्रताप यांनी यावर मत व्यक्त केलंय. “निवडणुकांनंतर भाजपाने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. ते राम भक्त नसून रावण भक्त आहेत. त्यांनी पेट्रोल, डिझेलसाठी कुपन्स वाटली पाहिजेत, ज्याप्रमाणे त्यांच्या मंत्र्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तिकीटं वाटली,” अश्या खोचक शब्दात प्रताप यांनी केंद्राकडे ही मागणी केली आहे.

मागील सात दिवसांपासून भारतामधील इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. पाच राज्यांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून इंधानेच दर स्थीर होते. मात्र मार्च महिन्यामध्ये २० तारखेपासून इंधानेच दर दिवसाला सरासरी ८० पैशांनी वाढू लागले. मागील आठ दिवसांमध्ये सात वेळा इंधनाचे दर वाढले आहेत.