मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खाननं पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणात काही दिवसांपूर्वी सलमानला अंधेरी कोर्टान समन्स बजावले होते. या प्रकरणात आता समन्स विरोधात सलमानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सलमानला अंधेरी कोर्टात ५ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. अंधेरी कोर्टानं या संदर्भात त्याला काही दिवसांपूर्वी समन्स बजावलं होतं. हे समन्स सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाझ शेख यांना २०१९ मध्ये एका पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी बजावलं होतं. तशी तक्रार त्या पत्रकारानं अधेरी डी.एन.नगर पोलिस स्टेशनमध्ये केली होती. कोर्टानं या केसप्रकरणी प्रक्रिया सुरु केली असून त्यासंदर्भात सलमानाला समन्स बजावले आहे.

प्रथमदर्शनी पत्रकारानं केलेल्या आरोपात मॅजिस्ट्रेटला तथ्य आढळल्यानंतर केसची प्रक्रिया सुरु होते आणि त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर रहावं लागतं. याच आधारावर अंधेरी कोर्टानं सलमानला ५ एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. सलमान खाननं आता अंधेरी कोर्टानं बजावलेल्या समन्स विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठापुढे सलमानच्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे.