मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पहिला सामना 26 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने चेन्नईचा 6 गडी राखून पराभव करत मोसमाची विजयी सुरुवात केली.
दरम्यान, आयपीएलचा 15वा सीझन सुरू होण्यापूर्वीच WWE सुपरस्टार सेठ रोलिन्सने KKRचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरसाठी एक खास संदेश शेअर केला आहे.
व्यंकटेश अय्यरने आयपीएल 2021मध्ये उत्तम कामगिरी केली, जिथे त्याने 10 सामन्यांमध्ये 41.11 च्या सरासरीने 370 धावा केल्या ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान त्याने स्पर्धेत तीन विकेट्सही घेतल्या.
नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान, टीम इंडियाच्या युवा खेळाडूने खुलासा केला होता की तो सेठ रोलिन्सचा खूप मोठा चाहता आहे आणि आता आयपीएल 2022 सुरू होण्याच्या एक दिवस आधी, माजी WWE चॅम्पियनने व्यंकटेश अय्यरला आश्चर्यचकित केले आहे.
WWE सुपरस्टार सेठ रोलिन्सने व्यंकटेशला शुभेच्छा देताना म्हटले, “मला ऐकून खूप आनंद झाला की व्यंकटेश अय्यर माझा फॅन आहे. हे माझे भाग्य आहे आणि ते मला आणखी चांगले करण्यासाठी प्रोत्साहन देईल. इंडियन प्रीमियर लीगसाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा. जा आणि किताब जिंका. तसेच त्याने व्यंकटेश अय्यरसाठी त्याच्या थीम सॉंगची एक ओळ देखील गायली.”
सेठ रोलिन्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि चाहत्यांनाही तो खूप आवडला आहे. या वर्षी श्रेयस अय्यर केकेआरचे नेतृत्व करत आहे, त्यामुळे या दोन्ही अय्यरची जोडी शाहरुख खानच्या टीमला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनवते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.