मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमातील 22 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध डीवाय पाटील स्टेडियमवर आमने-सामने होते. नाणेफेक जिंकल्यानंतर बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात संघाचे सर्व खेळाडू काळी पट्टी बांधून खेळताना दिसले. संघाची प्लेइंग इलेव्हन बदलण्यात आली, वेगवान गोलंदाज हर्षल पटेल त्याच्या बहिणीच्या निधनामुळे संघ निवडीसाठी उपलब्ध नव्हता.
मंगळवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात बंगळुरूचा संघ मैदानात उतरला तेव्हा सर्व खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. संघाचा गोलंदाज हर्षल पटेल याच्या बहिणीच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि कुटुंबाला शोक व्यक्त करण्यासाठी ही पट्टी बांधण्यात आली होती. काही दिवसांपासून आजारी असलेल्या हर्षलच्या बहिणीचे रविवारी निधन झाले. तेव्हा बंगळुरू संघ मुंबई विरुद्ध खेळत होता.
सामना संपल्यानंतर हर्षल आयपीएलमधील संघासाठी तयार केलेल्या बायो बबलमधून बाहेर पडला. तो संघात कधी सामील होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. टीमच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याला तीन दिवसांच्या क्वारंटाईनमधून जावे लागेल.