मुंबई : इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी चांगली नव्हती. असे असले तरी संघाची कामगिरी बऱ्यापैकी होती. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी फलंदाजीत चमकदार कामगिरी केली. कोहलीने आपल्या 41 धावांच्या खेळीत ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडला आहे.
रविवारी झालेल्या सामन्यात बंगळुरू संघाला पंजाबकडून पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार डू प्लेसिसचे धडाकेबाज अर्धशतक आणि कोहलीच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर संघाने प्रथम फलंदाजी करताना 200 च्या वर धावा केल्या. कर्णधाराने 57 चेंडूत 88 धावा केल्या तर कोहलीने 29 चेंडूत 41 धावांची जलद खेळी केली.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर वॉर्नरच्या टी-20 क्रिकेटमध्ये 10308 धावा आहेत, ज्या कोहलीने पंजाबविरुद्धच्या 41 धावांच्या खेळीने मागे सोडल्या. आरसीबीच्या माजी कर्णधाराच्या आता 327 टी-20 सामन्यांमध्ये 10314 धावा आहेत. यामध्ये 5 शतकांचाही समावेश आहे ज्या त्याने आयपीएल दरम्यान झळकावल्या आहेत.
टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्यात वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. 463 सामन्यात 22 शतकांसह 14562 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब मलिक असून त्याने 11698 धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ वेस्ट इंडिजच्या केरॉन पोलार्डने 11430 धावा केल्या आहेत.