hardik pandya
IPL 2022: Two pieces of stumps by Hardik Pandya's 'Rocket Throw'; Watch the video

मुंबई : हार्दिक पांड्या गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या फॉर्म आणि फिटनेसमुळे संघर्ष करत आहे. पण आयपीएल 2022 मध्ये तो जुन्याच स्टाईलमध्ये दिसत आहे. पंड्या प्रत्येक भूमिकेत फिट दिसतो आहे. मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो वा कर्णधारची भूमिका. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने आधी बॅटने फटकेबाजी केली आणि नंतर क्षेत्ररक्षणादरम्यान अप्रतिम धावबाद करत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्दिकचा फेक इतका वेगवान होता की, स्टंपचे दोन तुकडे झाले आणि सामना काही काळ थांबवावा लागला. त्याचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात 52 चेंडूत नाबाद 87 धावा केल्याबद्दल हार्दिकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. यासाठी त्याला एक लाख रुपयाचे बक्षिस मिळाले. पण त्याने उडवलेल्या स्टंपची किंमत 30 ते 50 लाखांपर्यंत आहे. म्हणजेच पंड्याने बक्षिसाच्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त किमतीचा स्टंप फोडून लाखोंचे नुकसान केले.

राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या 8व्या षटकात हार्दिक पांड्याने स्टंप आऊट केले. यावेळी लॉकी फर्ग्युसन हे षटक टाकत होता. संजू सॅमसन मिड-ऑफच्या दिशेने खेळत त्याचा 150 किमी प्रतितास वेगाचा चेंडू धावांसाठी धावला. पण गुजरातचा कर्णधार हार्दिक त्याच्यापेक्षा वेगवान असेल याची सॅमसनला कल्पना नव्हती.

हार्दिकने लगेचच जबरदस्त वेग दाखवत चेंडू पकडला आणि तो थेट नॉन-स्ट्रायकर एंडला फेकला आणि चेंडू थेट मिडल स्टंपवर गेला. सॅमसन क्रीजच्या आत पोहोचेपर्यंत तो आऊट झाला होता. पंड्याने 144.4 किमी वेगाने चेंडू फेकल्यामुळे स्टंपचे दोन तुकडे झाले. रनआऊटचा आनंद हार्दिकच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. कारण त्याने फॉर्मात असलेल्या राजस्थानच्या कर्णधाराची शिकार केली होती.

यानंतर काही काळ सामना थांबवावा लागला. नवीन स्टंप आणला गेला आणि मग सामना सुरू होऊ शकला. हार्दिकने या सामन्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासह चांगली गोलंदाजीही केली. त्याने 2.3 षटकात 18 धावा देत 1 बळीही घेतला. या मोसमात गुजरातने हार्दिकच्या नेतृत्वाखाली चौथा विजय नोंदवला आणि संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला.