DHONI
IPL 2022 : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात 'माही'ने मोडला तेंडुलकर आणि द्रविडचा मोठा विक्रम

मुंबई : IPL 2022 च्या पहिल्या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध, चेन्नई सुपर किंग्ज (CSK)चा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने धमाकेदार फलंदाजी करत संघाला संकटातून बाहेर काढत नाबाद अर्धशतक झळकावले. यादरम्यान, त्याने आयपीएलच्या इतिहासात एक मोठा विक्रमही केला आहे. एमएस धोनी हा अर्धशतक झळकावणारा सर्वात वयस्कर फलंदाज ठरला आहे. आणि या प्रकरणात त्याने माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले आहे.

चेन्नईचा यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने 40 वर्ष 262 दिवस हा विक्रम केला आहे. त्याच्या आधी हा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर होता, ज्याने 2013 मध्ये दिल्लीविरुद्ध 53 धावा केल्या होत्या. त्यावेळी राहुल द्रविड 40 वर्ष 116 दिवसांचा होता. तिसऱ्या क्रमांकावर हा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने दिल्लीविरुद्ध 39 वर्षे 362 दिवसांत अर्धशतक ठोकले.

आयपीएल 2022चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याने अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे संघाची कमान सोपवली आहे.

IPL 2022 च्या पहिल्या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्जचा सामना कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. प्रथम खेळताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 5 बाद 131 धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीने 38 चेंडूत नाबाद अर्धशतक झळकावले. चेन्नईची धावसंख्या 5 विकेटवर 61 धावा होती, त्यावेळी माही क्रीझवर आला. आपल्या सर्वोत्तम अर्धशतकादरम्यान त्याने 7 चौकार आणि 1 षटकार लगावला.