मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15व्या हंगामाला सुरुवात झाली असून यलो आर्मीने पहिल्याच सामन्यात विरोधी संघाला जोरदार टक्कर दिली आहे. दरम्यान, सीएसकेचा माजी खेळाडू सुरेश रैना सामना सुरू होण्यापूर्वीच भावूक झाला.
एका कार्यक्रमात रैनाने सामना सुरु होण्यापूर्वी एक इच्छा व्यक्त केली. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात रैना म्हणाला, “मी जेव्हा कार्यक्रमासाठी स्टेडियमकडे येत होतो तेव्हा चेन्नईचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हॉटेल सुद्धा स्टेडियमच्या जवळच होते आणि मला पिवळी जर्सी घालून स्टेडियममध्ये प्रवेश करावासा वाटला.” रैनाच्या या वक्त्यव्यानंतर चाहते देखील थोडे भावूक झाले.
या हंगामाच्या लिलावात सुरेश रैनाला कोणीही विकत घेतले नाही. रैना बराच काळ CSK कडून खेळला आहे पण गेल्या मोसमातील खराब कामगिरीनंतर त्याला सोडण्यात आले. रैनाने त्याचे नाव लिलावात 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह ठेवले होते, परंतु 10 पैकी एकाही संघाने त्याच्यात रस दाखवला नाही.
मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेल्या रैनाने 205 आयपीएल सामन्यांमध्ये 32.52 च्या सरासरीने 5,528 धावा केल्या आहेत. रैनाने लीगमध्ये एक शतक आणि 39 अर्धशतकं झळकावली आहेत. गोलंदाजीतही रैनाने आपल्या संघाला मदत केली असून 25 विकेट्स घेतल्या आहेत.
आता रैनाने समालोचन क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि तो स्टार स्पोर्ट्सच्या हिंदी कॉमेंट्री टीमचा एक भाग बनला आहे.