मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा मोसम पाच वेळा ट्रॉफी विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी फारच खराब चालू आहे. पहिल्या पाच सामन्यांत संघाला आतापर्यंत पराभव पत्करावा लागला आहे. बुधवारी कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकल्याने त्यांना पंजाब किंग्जविरुद्ध पहिला विजय मिळेल अशी आशा होती. गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे पंजाबला संधी मिळाली आणि त्यांनी 198 धावांची मोठी मजल मारली.
रोहितच्या नेतृत्वाखालील संघाला सलग पराभवाचा सामना करावा लागत आहे. मुंबईला पंजाबविरुद्ध 12 धावांनी पराभव पत्करावा लागला आणि संघाच्या पराभवाची संख्या पाच झाली. पहिल्या सामन्यात मुंबईच्या संघाला दिल्लीकडून, यानंतर राजस्थान नंतर कोलकाताकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.
बेंगळुरूविरुद्ध देखील मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, बुधवारी पंजाबविरुद्धचा पराभव हा त्यांचा स्पर्धेतील पाचवा पराभव ठरला. 2014 मध्येही त्यांना पहिल्या पाच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, संघाने पुनरागमन करताना बाद फेरी गाठण्यात यश मिळविले. संघाच्या चाहत्यांना पुन्हा त्याच कामगिरीची अपेक्षा आहे.
2012 मध्ये, डेक्कन चार्जर्सचा संघ (यापुढे स्पर्धेचा भाग नाही) सलग पाच सामने हरले होते. 2013 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) बाबतही असेच झाले होते. 2014 सालीही मुंबईचा संघ सलग पाच सामने हरला होता. 2019 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूलाही पहिल्या पाच सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता 2022 मध्ये पाच वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर दुसऱ्यांदा पहिले पाच सामने गमावण्याच्या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.