मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला बुधवारी (13 एप्रिल) पुण्यात पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या IPL सामन्यात विशेष विक्रम करण्याची संधी असेल. रोहितने या मोसमात खेळल्या गेलेल्या 4 सामन्यांमध्ये आतापर्यंत फक्त 80 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 41 धावा आहे.
जर रोहितने या सामन्यात 25 धावा केल्या तर तो टी-20 क्रिकेटमधील 10000 धावा पूर्ण करेल. हा आकडा गाठणारा तो दुसरा भारतीय आणि जगातील सातवा खेळाडू ठरणार आहे. रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये 374 सामन्यांच्या 361 डावांमध्ये 31.76 च्या सरासरीने 9975 धावा केल्या आहेत. आतापर्यंत, फक्त विराट कोहलीने भारतासाठी 10 हजार धावा केल्या आहेत, ज्याच्या नावावर 10379 धावा आहेत.
आयपीएलमध्ये 500 चौकार
रोहित शर्मा आयपीएलमध्ये चौकार मारताच त्याचे 500 चौकार पूर्ण करेल. शिखर धवन, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर आणि सुरेश रैना यांच्यानंतर ही कामगिरी करणारा तो पाचवा खेळाडू ठरणार आहे.
या मोसमात आतापर्यंत पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. पहिल्या चार सामन्यांत चार पराभवांसह संघ दहाव्या क्रमांकावर गुणतालिकेत तळाशी आहे.