
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 15 व्या हंगामातील 18 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. या सामन्यात मुंबई संघाचा 7 विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यादरम्यान बंगळुरूचा स्टार गोलंदाज हर्षल पटेलला अत्यंत वाईट बातमी मिळाली. बऱ्याच दिवसांपासून आजारी असलेल्या त्याच्या बहिणीचे शनिवारी निधन झाले.
शनिवारी डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात बंगळुरूचा सामना मुंबई संघाशी झाला. याच सामन्यादरम्यान बंगळुरूचा वेगवान गोलंदाज हर्षलला बहिणीच्या मृत्यूची बातमी मिळाली. या दु:खाच्या काळात संघ या खेळाडूसोबत दिसला आणि व्यवस्थापनाने तातडीने घरी जाण्याची व्यवस्था केली. सध्या तो टूर्नामेंट खेळत आल्यामुळे बायो बबलचा भाग आहे. त्याला बायो बबलमधून बाहेर पडून त्याच्या घरी जावे लागले, यामुळे आता त्याला बबलमध्ये परत येण्यासाठी क्वारंटाईनचे नियम पाळावे लागतील.
शनिवारी बंगळुरू आणि मुंबईचा सामना सुरू असताना हर्षलच्या बहिणीचे निधन झाले. सामना संपल्यानंतर लगेचच तो एका दिवसासाठी त्याच्या घरी गेला आहे. एक दिवसानंतर तो संघात सामील होईल. त्याची बहीण बऱ्याच दिवसांपासून आजारी होती, अशी माहिती मिळाली आहे.