मुंबई : आयपीएल नवा फ्रँचायझी संघ गुजरात टायटन्सने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. पंजाबविरुद्ध शुक्रवारी खेळल्या गेलेल्या अखेरच्या षटकातील रोमहर्षक सामन्यात संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात राहुल तेवतियाने शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने पंजाबच्या पराभवाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.
सामन्यानंतर हार्दिक म्हणाला, “आता होणाऱ्या चढ-उतारांशी मी जुळवून घेतले आहे आणि ते माझ्यासाठी स्वाभाविक झाले आहे. तेवतियाला सलाम. थेट मैदानात जाऊन असे मोठे फटके मारणे खूप कठीण आहे, आणि तेही अशा प्रचंड दबावाच्या परिस्थितीत. हा सामना फक्त पंजाब संघासाठी होता, माझी संपूर्ण सहानुभूती त्यांच्या संघासोबत आहे.”
कर्णधार हार्दिकने युवा शुभमन गिलचेही कौतुक केले आहे, तसेच पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनचेही कौतुक केले, या सामन्यात गिलने 96 तर सईने 35 धावा केल्या. 27 धावांसह कर्णधाराने 4 षटकात 36 धावा देत 1 बळीही घेतला.
हार्दिक पुढे म्हणाला, “गिल आता सर्वांना हे सांगत आहे की बघा, मी इथे आहे. आमच्या संघाच्या विजयात साईने केलेल्या भागीदारीचे बरेच श्रेय जाते. या दोन भागीदारींनी आम्हाला सामन्यात टिकवून ठेवले. तसेच गोलंदाजी करताना मला थकवा जाणवत आहे कारण मला चार षटके टाकायची सवय नाही. पण तरीही आता हळूहळू बरे होत आहे.”