rcb
IPL 2022: Punjab Kings make a winning start; Big win against Bangalore

मुंबई : मुंबईच्या डी. वाय स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघानं आरसीबीचा पराभव करत आयपीएलची विजयी सुरुवात केली आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून बंगळुरूविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार डू प्लेसिसचे धडाकेबाज अर्धशतक आणि कार्तिकच्या वेगवान फलंदाजीच्या जोरावर बेंगळुरूने 20 षटकांत 2 बाद 205 धावा केल्या. मोठ्या धावांचा डोंगर उभारून देखील आरसीबीला पराभवाला सामोरे जावे लागले. ओडिन स्मिथने खेळलेल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर पंजाबने 19 षटकांत 5 बाद 208 धावा करून विजयाची नोंद केली.

आरसीबीने उभा केलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार मयंक अग्रवाल आणि अनुभवी शिखर धवन ही जोडी डावाची सलामी देण्यासाठी मैदानात उतरली. या दोन्ही फलंदाजांनी अवघ्या पाचव्या षटकात संघाला पन्नासच्या पुढे नेले. पॉवरप्लेमध्ये मयंक आणि धवन यांनी एकही विकेट न गमावता संघासाठी 63 धावा जोडल्या. पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर वनिंदू हसरंगाने विकेट घेतली. मयंकच्या 32 धावांवर शाहबाजने अप्रतिम झेल घेत त्याला माघारी पाठवले.

शिखर धवनची २९ चेंडूत ४१ धावांची खेळी हर्षल पटेलले मोडली आणि त्याला झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या भानुका राजपक्षेला मोहम्मद सिराजने शाहबाजच्या हाती झेलबाद केले. तो 22 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 43 धावा करून परतला. यानंतर पुढच्याच चेंडूवर अंडर 19 चा स्टार राज बावा एलबीडब्ल्यू आऊट झाला. वेगवान खेळी करणारा आकाशदीप अनुज रावतच्या हाती झेलबाद झाला.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिससह युवा अनुज रावत डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले. या दोन्ही फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता संघासाठी 41 धावांची खेळी केली. यामध्ये रावतच्या 19 धावा आणि डु प्लेसिसच्या 10 धावांचा समावेश होता, तर 12 धावा अतिरिक्त रुपात संघाला मिळाल्या. राहुल चहरने आपल्या पहिल्याच षटकात 21 धावांवर रावतला क्लीन बॉलिंग करून पंजाबला पहिले यश मिळवून दिले.

संथ सुरुवातीनंतर डु प्लेसिसने जोरदार फटके मारत 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान कर्णधाराने 3 षटकार आणि 2 चौकार लगावले. गोलंदाजांचा समाचार घेत दोघांनीही धमाकेदार शैलीत शतकी भागीदारी पूर्ण केली. 57 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 88 धावांची खेळी केल्यानंतर तो बाद झाला. अर्शदीपच्या चेंडूवर शाहरुखने त्याचा अप्रतिम झेल घेतला.अखेरीस, दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 32 धावा करत संघाला 200 धावांच्या पुढे नेले. कोहलीने 29 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 41 धावा केल्या.