kkr
IPL 2022: Mumbai Indians washed out by KKR; Third consecutive defeat of the season

पुणे : कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) आयपीएल 2022 मध्ये तिसरा विजय नोंदवला आहे. व्यंकटेश अय्यरने अर्धशतक ठोकले तर पॅट कमिन्सने शेवटच्या षटकात आक्रमक खेळी केली. संघाने स्पर्धेच्या (IPL 2022) 14 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. संघाचा 4 सामन्यातील हा तिसरा विजय आहे. या विजयासह संघ गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर मुंबईचा हा सलग तिसरा पराभव आहे. प्रथम खेळताना मुंबईने 4 गड्यांच्या मोबदल्यात 161 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने 16 षटकांत लक्ष्य गाठले. कमिन्सने 15 चेंडूत नाबाद 56 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. अजिंक्य रहाणे 11 चेंडूत 7 धावा काढून वेगवान गोलंदाज टायमल मिल्सचा बळी ठरला. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरलाही मोठी खेळी करता आली नाही. तो 6 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. यावेळी त्याने 2 चौकार मारले. डॅनियल सॅम्सने त्याची विकेट घेतली. 6 षटकांनंतर संघाची धावसंख्या 2 बाद 35 धावा होती.

चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या सॅम बिलिंग्सने काही चांगले फटके खेळले. त्याने 12 चेंडूत 17 धावा आणि 2 षटकार ठोकले. त्याने व्यंकटेश अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी केली. लेगस्पिनर मुरुगन अश्विनला बिलिंग्जची विकेट मिळाली. अय्यरला डावात मोकळेपणाने खेळता आले नाही. दरम्यान, नितीश राणा 7 चेंडूत 8 धावा काढून अश्विनचा दुसरा बळी ठरला.

केकेआरच्या 100 धावा 13व्या षटकात पूर्ण झाल्या आणि 4 विकेट पडल्या. अखेरच्या 7 षटकात संघाला 61 धावा करायच्या होत्या. 14व्या षटकात आंद्रे रसेलला बाद करत मिल्सने मुंबईला मोठे यश मिळवून दिले. रसेलने 5 चेंडूत 11 धावा केल्या. यावेळी त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. संघाला शेवटच्या 5 षटकात 5 विकेट्स शिल्लक असताना 35 धावा करायच्या होत्या. अय्यर आणि पॅट कमिन्स क्रीजवर होते.

पॅट कमिन्सने आक्रमक खेळी करत केकेआरला विजय मिळवून दिला. त्याने 15 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या. 4 चौकार आणि 6 षटकार मारले. म्हणजेच त्याने केवळ चौकारावरून 53 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 373 होता. अय्यर 41 चेंडूत 50 धावा करून नाबाद राहिला. यावेळी त्याने 6 चौकार आणि 1 षटकार मारला.

केकेआरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचे टॉप-3 फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. कर्णधार रोहित शर्माने 12 चेंडूत 3 धावा केल्या आणि त्याला वेगवान गोलंदाज उमेश यादवने बाद केले. उमेशने चालू मोसमात पॉवरप्लेमध्ये सहावी विकेट घेतली. यानंतर डेवाल्ड ब्रेव्हिसने 19 चेंडूत 29 धावा केल्या. यावेळी त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. इशान किशनला 21 चेंडूत केवळ 14 धावा करता आल्या.

11 षटकांनंतर मुंबईची धावसंख्या 3 बाद 55 अशी होती. यावेळी सूर्यकुमार यादव आणि टिळक वर्मा यांनी संघाची धुरा सांभाळली. 15 षटकांनंतर 3 बाद 85 धावा झाल्या होत्या. यानंतर सूर्यकुमार आणि टिळक वर्मा यांनी हात उघडले. सूर्यकुमारने 36 चेंडूत 52 धावा केल्या. तर टिळक वर्मा 27 चेंडूत 38 धावा करून नाबाद राहिला. किरन पोलार्डने शेवटच्या षटकात 3 षटकार ठोकले. तो 5 चेंडूत 22 धावा करून नाबाद राहिला. अखेरच्या 5 षटकात संघाने 76 धावा केल्या.

केकेआरकडून उमेश यादवने पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 25 धावा देऊन एक विकेट घेतली. मोसमातील पहिला सामना खेळणारा पॅट कमिन्स चांगलाच महागात पडला. त्याने 4 षटकात 49 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले.