मुंबई : आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर हैदराबाद विरुद्ध कोलकाता अशी टक्कर होणार आहे. हैदराबाद संघपुढे मागील सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान असेल. विल्यमसन आणि अभिषेक शर्मा यांना पुन्हा एकदा चांगली खेळी करावी लागणार आहे. दुखापतीमुळे उपलब्ध नसलेल्या वॉशिंग्टन सुंदरची संघाला नक्कीच उणीव भासेल. सुंदर पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे हैदराबादचे गोलंदाजी आक्रमण कठीण दिसत आहे. भुवनेश्वर कुमार गेल्या सामन्यात लयीत दिसला नाही तर उमरान मलिकने आपल्या वेगाने सर्वांनाच चकित केले असले तरी विकेट घेण्याच्या बाबतीत त्याला फारसे यश मिळत नाही.
गेल्या दोन सामन्यांमध्ये विल्यमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे, ज्यामुळे संघाला विजयाची नोंद करण्यात यश आले आहे. सीएसकेविरुद्ध दोघांनी पहिल्या विकेटसाठी 89 धावा आणि गुजरातविरुद्ध 64धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांकडून पुन्हा एकदा अशाच खेळीची अपेक्षा असेल.
मधल्या फळीत राहुल त्रिपाठीने गेल्या दोन सामन्यांमध्ये संघाला चांगली साथ दिली होती. गुजरातविरुद्धच्या सामन्यात रिटायर्ड हर्ट झाला असला तरी तो ठीक असल्याचे कोचने कबूल केले होते आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी असेलही सांगितले होते. त्याच्या व्यतिरिक्त, निकोलस पूरन आणि एडन मार्कराम मधल्या फळीत चांगल्या रंगात दिसले जे संघासाठी चांगले चिन्ह आहे.
गोलंदाजीत भुवनेश्वरच्या नेतृत्वाखाली संघाकडे उमरान मलिक, टी नटराजन आणि मार्को येनसेनच्या रूपाने वेगवान गोलंदाज आहेत. यासामन्यात श्रेयस गोपालला फिरकीमध्ये संधी मिळू शकते.
हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (क), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, मार्को येन्सन, उमरान मलिक, टी नटराजन