मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर IPL 2022 च्या आठव्या लीग सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने होते. या सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचा संघ 18.2 षटकात 137 धावांवर सर्वबाद झाला. आंद्रे रसेलच्या झंझावाती 70 धावांच्या जोरावर संघाने विजयाचे लक्ष्य 14.2 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह संघाचे चार गुण झाले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्यात यश मिळाले.
पंजाबकडून 138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर यांनी कोलकात्याच्या डावाची सलामी दिली. पहिला सामना खेळणाऱ्या कागिसो रबाडाने १२ धावांवर रहाणेला ओडिन स्मिथच्या हाती झेलबाद केले. पुढे स्मिथच्या चेंडूवर हरप्रीतने अप्रतिम झेल घेत वेंकटेशला माघारी पाठवले. राहुल चहरने आपल्या पहिल्याच षटकात कर्णधार श्रेयस अय्यरची विकेट घेत पंजाबला मोठे यश मिळवून दिले.15 चेंडूत 26 धावा करून रबाडाने त्याला झेलबाद केले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राहुलने खाते न उघडता नितीश राणाला एलबीडब्ल्यू बाद केले.
अवघ्या 26 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने रसेलने झंझावाती अर्धशतक ठोकत संघाचा विजय जवळपास निश्चित केला. 31 चेंडूत 8 षटकार आणि 2 चौकारांसह 70 धावांची नाबाद खेळी करत कोलकाताला विजयापर्यंत नेले.
पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या एका धावेवर कर्णधार मयंक अग्रवालला वेगवान गोलंदाज उमेश यादवने लेग बिफोर बाद केले. भानुका राजपक्षेने 9 चेंडूत 31 धावा केल्या, ज्यात हॅट्ट्रिक षटकाराचा समावेश होता. त्याला शिवम मावीने झेलबाद केले. या सामन्यात शिखर धवनने 15 चेंडूत 16 धावा केल्या आणि टीम साऊदीच्या हाती झेलबाद झाला. लियाम लिव्हिंगस्टोनने 19 धावांची खेळी केली आणि तो उमेश यादवचा दुसरा बळी ठरला.
राज बावाने 11 धावांची खेळी केली आणि सुनील नरेनने त्याला बाद केले. टिम साऊदीने शून्य धावांवर शाहरुख खानला नितीश राणाच्या हाती झेलबाद केले. हरप्रीत 14 धावांवर उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला, तर राहुल चहर खाते न उघडता झेलबाद झाला. या सामन्यातील त्याची ही चौथी विकेट होती. आंद्रे रसेलच्या चेंडूवर रबाडाने 25 धावा केल्या, तर अर्शदीप सिंग खाते न उघडता धावबाद झाला. केकेआरकडून उमेश यादवने चार, टीम साऊदीने दोन तर शिवम मावी, सुनील नरेन आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक बळी घेतला.