मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने बुधवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात 17 चेंडूंचा सामना केला आणि तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. या खेळीदरम्यान रोहितने एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
T20 क्रिकेटमध्ये 10000 धावा करणारा रोहित भारतातील दुसरा आणि जगातील सातवा खेळाडू ठरला आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये 362 डावांमध्ये हा आकडा गाठला आहे. कागिसो रबाडाच्या चेंडूवर षटकार ठोकत रोहितने 10000 हजार धावा पूर्ण केल्या. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. रोहितच्या आधी फक्त विराट कोहलीनेच भारतासाठी 10,000 रन्स बनवले होते. आयपीएल 2021 मध्ये कोहलीने हा पराक्रम केला होता.
T20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर असून त्याच्या नावावर 14562 धावा आहेत. त्यांच्याशिवाय शोएब मलिक (11,698), किरॉन पोलार्ड (11,474), अॅरॉन फिंच (10,499), विराट कोहली (10,379) आणि डेव्हिड वॉर्नर (10,373) यांचा या यादीत समावेश आहे. आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर रोहित सर्वाधिक धावांच्या बाबतीत कोहली आणि शिखर धवननंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
रोहित आयपीएलच्या इतिहासात 500 किंवा त्याहून अधिक चौकार मारणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत शिखर धवन, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर आणि सुरेश रैना यांसारखे दिग्गज फलंदाजच या टप्प्यावर पोहोचले आहेत.