मुंबई : राजस्थान विरुद्धच्या विजयानंतर गुजरात टायटन्सचा संघ आयपीएलमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. संघाने स्पर्धेतील त्यांच्या 5व्या सामन्यात (IPL 2022) राजस्थान रॉयल्सचा 37 धावांनी पराभव केला. हा संघाचा 5 सामन्यातील चौथा विजय आहे. या सामन्यात (RR vs GT) गुजरातने प्रथम खेळताना 4 गडी गमावून 192 धावा केल्या होत्या. कर्णधार हार्दिक पंड्याने 87 धावांची नाबाद खेळी केली. चालू मोसमातील त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ 9 गडी गमावून 155 धावाच करू शकला. जोस बटलरने अर्धशतक ठोकले, पण ते संघाच्या विजयासाठी अपुरे ठरले. राजस्थानचा हा 5 सामन्यातील दुसरा पराभव आहे. यासह आता संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आला आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने वेगवान सुरुवात केली. संघाने 2 षटकांत 28 धावा केल्या. मात्र, देवदत्त पडिक्कल शून्यावर बाद झाला. त्याला डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल बाद केले. त्यानंतर अश्विन फलंदाजीसाठी आला. तो 8 चेंडूत 8 धावा काढून लॉकी फर्ग्युसनच्या बॉलवर आउट झाला.
जोस बटलरने एका बाजूने अत्यंत आक्रमक फलंदाजी केली. त्याने 24 चेंडूत 54 धावा केल्या. यावेळी त्याने 8 चौकार आणि 3 षटकार मारले. म्हणजेच केवळ चौकार आणि षटकारांसह 50 धावा झाल्या. चालू आयपीएल मोसमातील त्याचे हे दुसरे अर्धशतक आहे. त्याने शतकही झळकावले आहे. दरम्यान, कर्णधार संजू सॅमसन 11 धावा करून धावबाद झाला. हार्दिक पांड्याच्या थेट थ्रोवर त्याला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले.
व्हॅन डर डुसेन हा 6 धावा करून यश दयालचा दुसरा बळी ठरला. 90 धावांवर 5 विकेट पडल्यानंतर शिमरॉन हेटमायरने आक्रमक फटके खेळण्यास सुरुवात केली. त्याने 17 चेंडूत 29 धावा केल्या. यावेळी त्याने 2 चौकार आणि एक षटकार मारला. त्याची विकेट वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला घेतली. 116 धावांवर 6 गडी बाद झाल्याने राजस्थानचा संघ सामन्यातून बाहेर पडला.
राजस्थान रॉयल्सला शेवटच्या 5 षटकात 4 विकेट्स शिल्लक असताना 63 धावा करायच्या होत्या. दरम्यान, 16 चेंडूत 18 धावा करून रियान पराग फर्ग्युसनचा तिसरा बळी ठरला. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. नीशम 15 चेंडूत 17 धावा करून पंड्याचा बळी ठरला. चहल 5 धावा करून बाद झाला. यश दयालची ही तिसरी विकेट होती. प्रसिद्ध कृष्णा 4 आणि कुलदीप सेन शून्यावर नाबाद राहिले.
तत्पूर्वी, गुजरात टायटन्सचा संघ नाणेफेक गमावून फलंदाजीसाठी उतरला. संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने 15 धावा आणि 2 गडी गमावले. सलामीवीर फलंदाज मॅथ्यू वेड 6 चेंडूत 12 धावा करून बाद झाला आणि विजय शंकरने 7 चेंडूत 2 धावा केल्या. शुभमन गिललाही मोठी खेळी करता आली नाही. तो 14 चेंडूत 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
कर्णधार हार्दिक पंड्या आणि अभिनव मनोहर यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. दोघांनी 55 चेंडूत 86 धावा जोडल्या. मनोहर28 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. 4 चौकार आणि 2 षटकार मारले. दरम्यान, पंड्याने आयपीएलमधील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. तो 52 चेंडूत 87 धावा करून नाबाद राहिला. 8 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 154 होता.
हार्दिक पांड्याने डेव्हिड मिलरसह चौथ्या विकेटसाठी 25 चेंडूत नाबाद 53 धावा जोडल्या. मिलर 14 चेंडूत 31 धावा करून नाबाद राहिला. 5 चौकार आणि एक षटकार मारला. कुलदीप सेन महागात पडला. त्याने 4 षटकात 51 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली.