मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. सामन्यात दररोज मोठी धावसंख्या उभारली जात आहे. स्पर्धेच्या पहिल्या सेटचे सामने संपले असून दुसऱ्या सेटसाठी चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. आता सामना पाहण्यासाठी स्टेडियममधील प्रेक्षकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 25 टक्के प्रेक्षक क्षमतेने सुरू झालेल्या या स्पर्धेची संख्या 50 टक्के करण्यात आली आहे.
आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी आता स्टेडियममध्ये प्रेक्षकांची संख्या वाढणार आहे. याबात आयपीएल भागीदार बुक माय शोने माहिती दिली आहे की आता सामन्याच्या 50 टक्के तिकिटांची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी ही माहिती देताना सांगण्यात आले की, स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची क्षमता वाढवण्यात आली आहे.
तिकीट भागीदाराने दिलेल्या माहितीनुसार, पुढील सामन्यांच्या तिकिटांची विक्री सुरु झाली आहे, आता बीसीसीआयने प्रेक्षक क्षमता 25 वरून 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे, त्यानंतर आम्ही तिकीट विक्रीची संख्या देखील वाढवत आहोत. त्यामुळे आता जास्तीत जास्त प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन आयपीएलचा थरार अनुभवता येणार आहे.
यावर्षी कोरोनामुळे आयपीएलचे सामने संपूर्ण भारताऐवजी फक्त मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियममध्ये आयोजित केले जात आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमशिवाय डीवाय पाटील स्टेडियम नवी मुंबई, ब्रेबॉर्न आणि वानखेडे येथे हे सामने होणार आहेत.