ASHWIN
IPL 2022: For the first time in IPL history, the batsman is 'retired out'

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामात बीसीसीआयने अनेक नवीन नियम लागू केले आहेत. नवीन हंगामाच्या 20 व्या सामन्यात, या स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळाली. 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा खेळाडू आउट न होताच मैदानाबाहेर गेला. राजस्थान आणि लखनऊ यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘रिटायर्ड आऊट’ पाहायला मिळाला.

आयपीएलच्या 20 व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आर अश्विन बॅटींग करत असताना अचानक क्रिझ सोडून पॅव्हिलियनमध्ये निघून गेला. डावाच्या 19व्या षटकात फलंदाजी करताना तो अंपायरच्या परवानगीशिवाय परत डग-आऊटमध्ये गेला.

आयपीएलच्या इतिहासातील पहिला ‘रिटायर्ड आऊट’

लखनऊविरुद्धच्या सामन्यात व्हॅन डर ड्युसेन 9.5 षटकांत बाद झाल्यानंतर अश्विनला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. 23 चेंडूत 28 धावांचे योगदान दिल्यानंतर अश्विनला वाटले की तो संघाच्या आवश्यकतेनुसार फलंदाजी करू शकत नाही, तेव्हा त्याने 18.2 चेंडूत ‘रिटायर्ड आऊट’ घेण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे बाद होणारा तो आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, काल संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली, राजस्थान रॉयल्सचा सामना केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ लखनऊ सुपर जायंट्सशी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने 20 षटकांत 6 बाद 165 धावा केल्या आणि लखनऊसमोर विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, लखनऊ 20 षटकांत 8 गडी गमावून 162 धावाच करू शकला.