मुंबई : IPL 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांची कामगिरी खराब झाली आहे. असे असूनही हे दोन मोठे संघ पुनरागमन करतील आणि प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, माजी भारतीय खेळाडू आकाश चोप्राचे मत वेगळे आहे. त्याच्या मते, आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ यावेळी प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाहीत.
चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या पाच सामन्यांपैकी एक जिंकला आहे आणि गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे तर मुंबई इंडियन्सने त्यांचे आतापर्यंतचे पाचही सामने गमावले आहेत आणि ते शेवटच्या स्थानावर आहेत. आकाश चोप्राने दोन्ही संघांच्या खराब कामगिरीसाठी कमकुवत गोलंदाजी आक्रमणाला जबाबदार धरले आहे.
आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओत हे दोन्ही संघ टॉप 4 मध्ये का पोहोचणार नाहीत हे स्पष्ट केले. तो म्हणाला,
चेन्नई आणि मुंबई या दोन्ही संघांकडे सोपी गोलंदाजी आक्रमणे आहेत. अशा परिस्थितीत ते त्याच संघासोबत खेळत राहिल्यास आणि अचानक काहीतरी बदलण्याची अपेक्षा ठेवली तर ते शक्य नाही. मुंबई इंडियन्सला त्यांच्या इलेव्हनमध्ये बदल करावे लागतील तर सीएसकेची गोलंदाजी सुधरवण्याची गरज आहे. तरी देखील मला हे दोन संघ टॉप 4 मध्ये जाताना दिसत नाही.
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, आतापर्यंतचा हा मोसम युवा खेळाडूंच्या नावावर आहे, ज्यांना आपले कौशल्य दाखवायचे आहे. ज्यामध्ये साई सुदर्शन, आयुष बडोनी, डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा आणि जितेश शर्मा यांचा समावेश आहे.
पुढे त्याने वैभव अरोरा आणि कुलदीप सेन यांचाही उल्लेख केला जे त्यांच्या संघासाठी महत्त्वाचे ठरत आहेत. चोप्रा म्हणाले, “हे आयपीएल निडर आणि खेळावर आपला ठसा उमटवण्यास इच्छुक असलेल्या तरुणांसाठी आहे. आयुष बडोनी, साई सुदर्शन, ब्रेविस, टिळक, वैभव अरोरा, कुलदीप सेन, जितेश शर्मा मुख्य म्हणजे सर्वच सलामीवीर फलंदाज नसतात. काही मध्यमगती गोलंदाज आहेत तर काही खालच्या क्रमाने फलंदाजी करतात परंतु तरीही ते प्रभाव पाडण्यात सक्षम आहेत.”