मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमातील सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी झाला. पहिल्या सामन्यात अपयशी फलंदाजीमुळे टीकेचा सामना करणाऱ्या चेन्नई संघाने दणदणीत 210 धावांची मजल मारली. या सामन्यात पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी फॉर्ममध्ये दिसला.
चेन्नईचा माजी कर्णधार धोनी या मोसमात पूर्ण रंगात दिसत आहे. पहिल्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही तो अप्रतिम फलंदाजी करताना दिसला. सामना संपवायला पोहोचलेल्या धोनीने फक्त 6 चेंडू खेळले पण यावेळी त्याने 16 धावा केल्या. हा धडाकेबाज खेळाडू येताच त्याने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. त्याच्या 16 धावांच्या खेळीत दोन चौकारही मारले. यादरम्यान तो टी-२० क्रिकेटमध्ये ७ हजार धावा करणारा फलंदाज बनला.
लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनीच्या खात्यात एकूण 6985 धावा होत्या. 7 हजारांचा आकडा गाठण्यासाठी त्याला 15 धावांची गरज होती आणि त्याने 16 धावांची भर घालून या विशेष यादीत स्थान मिळवले. विराट कोहलीने 311 टी-20 डावांमध्ये एकूण 10326 धावा केल्या आहेत, त्यानंतर सध्याचा टी-20 कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याने 358 डावात 9936 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवनचे नाव आहे, ज्याच्या खात्यात एकूण 8818 टी-20 धावा आहेत. सुरेश रैनाने 8654 टी-20 धावा केल्या आहेत तर रॉबिन उथप्पाच्या नावावर 7070 धावा आहेत. धोनीनेही या क्लबमध्ये स्थान मिळवले.