मुंबई : राजस्थान रॉयल्सने IPL 2022 ची धमाकेदार सुरुवात केली आहे. संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात (SRH vs RR) सनरायझर्स हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. हैदराबादविरुद्धचा हा राजस्थानचा सर्वात मोठा विजय आहे. याआधी त्यांनी 2021 मध्ये त्यांचा 55 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात प्रथम खेळताना राजस्थान रॉयल्सने 6 गडी गमावत 210 धावा केल्या होत्या. चालू आयपीएल हंगामातील कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. कर्णधार संजू सॅमसनने 55 धावांची आक्रमक खेळी केली. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 149 धावाच करू शकला.
यादरम्यान, देवदत्त पडिक्कल याचा एक शॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 12व्या षटकात देवदत्त पडिक्कलने नटराजनच्या पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकला, पडिक्कलने मारलेला हा षटकार थेट टाटा पंच बोर्डवर गेला. आता टाटा समूह काजीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या संवर्धनासाठी 5 लाख रुपये देणार आहे.
टाटा समूह इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा अधिकृत प्रायोजक आहे. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी, टाटा समूहाने जाहीर केले होते की जर एखाद्या फलंदाजाचा शॉट टाटा पंच बोर्डवर आदळला तर काजीरंगा राष्ट्रीय उद्यानाला 5 लाख रुपये दान केले जातील.
Devdutt Padikkal Six #SRHvsRR #IPL2022 pic.twitter.com/Otub15GDCX
— Amanpreet Singh (@AmanPreet0207) March 29, 2022
पडिक्कल हा आयपीएल 2020 हंगामात आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. तथापि, IPL 2021 च्या UAE लीगमधील सरासरी कामगिरीनंतर, फ्रँचायझीने त्याला IPL 2022 च्या लिलावापूर्वी सोडले. त्यानंतर आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने या खेळाडूला 7.75 कोटी रुपयांना करारबद्ध केले.