मुंबई : चेन्नई सुपर किंग्जच्या इतक्या खराब कामगिरीचा क्वचितच कोणी विचार केला असेल. पण आयपीएल 2022 मध्ये रविवारी हे पाहायला मिळाले. संघाने पराभवाची हॅट्ट्रिक साधली. पंजाब किंग्जने प्रथम खेळताना 8 गडी गमावून 180 धावा केल्या. प्रत्युत्तरात गतविजेत्या सीएसकेचा संघ 18 षटकांत 126 धावांवर संपुष्टात आला. अशा प्रकारे पंजाबने हा सामना 54 धावांनी जिंकला. पंजाबचा हा 3 सामन्यातील दुसरा विजय आहे. याआधी केकेआर आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धही सीएसकेचा पराभव झाला होता. नवा कर्णधार रवींद्र जडेजा आतापर्यंत सपशेल अपयशी ठरला आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. दुसऱ्याच षटकात ऋतुराज गायकवाड धाव घेत वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचा बळी ठरला. पुढच्या षटकात रॉबिन उथप्पाने 10 चेंडूत 13 धावा केल्या आणि त्याला वैभव अरोराने बाद केले. यानंतर मोईन अलीला खातेही उघडता आले नाही आणि तो वैभवचा बळी ठरला. संघाने 22 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या.
कर्णधार रवींद्र जडेजाही फलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही. तो 3 चेंडूत शून्य धावा करून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला बळी पडला. यानंतर अंबाती रायुडूला ओडियन स्मिथने बाद केले. त्याने 13 धावा केल्या. चेन्नईचा निम्मा संघ 36 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि शिवम दुबे यांनी संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला.
5 विकेट लवकर पडल्यानंतर धोनी आणि शिवम दुबे यांनी सहाव्या विकेटसाठी 62 धावा जोडून संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण फिरकीपटू लिव्हिंगस्टोनने शिवम आणि ब्राव्होला 2 चेंडूत बाद करून सामना संपवला. शिवमने 30 चेंडूत 57 धावा केल्या. यावेळी त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. ब्राव्हो खातेही उघडू शकला नाही. प्रिटोरियस 8 धावांवर लेगस्पिनर राहुल चहरच्या हाती बाद झाला. संघाने 107 धावांवर 8वी विकेट गमावली.
यानंतर 28 चेंडूत 23 धावा करून धोनी राहुलचा दुसरा बळी ठरला. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. चहरच्या चेंडूवर जॉर्डन 5 धावा काढून बाद झाला. पंजाबने 6 गोलंदाज आजमावले आणि सर्वांनी किमान एक बळी घेतला.
या सामन्याच्या सुरुवातीला चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार मयांक अग्रवालने पहिल्या षटकात 4 धावा दिल्या. भानुका राजपक्षेही अवघ्या 9 धावा करून बाद झाला. 14 धावांत 2 गडी बाद झाल्यानंतर लियाम लिविंगस्टोन आणि शिखर धवन यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. धवन 24 चेंडूत 33 धावा करून बाद झाला.
लिविंगस्टोनने 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 32 चेंडूत 60 धावा करून तो बाद झाला. त्याने 5 चौकार आणि 5 षटकार मारले. त्यानंतर जितेश शर्माने 17 चेंडूत 26 धावा करत संघाला 150 धावांच्या पुढे नेले. मात्र, पंजाबच्या फलंदाजांना शेवटच्या 5 षटकांत केवळ 33 धावाच करता आल्या. यामुळे संघाला 200 धावांचा पल्ला गाठता आला नाही. चेन्नईकडून ख्रिस जॉर्डन आणि प्रिटोरियस या दोघांनी 2-2 विकेट घेतल्या.