मुंबई : आयपीएल 2022 मध्ये आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना आता क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. दिल्ली कॅम्पमधून अशा बातम्या येत असल्याने आता शनिवारी होणाऱ्या दिल्ली आणि आरसीबी यांच्यातील सामन्यावर सस्पेंस निर्माण झाला आहे.
पॅट्रिकच्या पॉझिटिव्हची पुष्टी बीसीसीआयने एका निवेदनाद्वारे केली आहे ज्यात म्हटले आहे की दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाली आहे. आणि वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
या मोसमात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाची आतापर्यंतची कामगिरी पाहिली तर ती संमिश्र म्हणावी लागेल. या संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यापैकी दोन सामने संघाने जिंकले आहेत. दोन सामन्यातील विजयासह दिल्ली संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. सध्या या संघाला आणखी 10 साखळी सामने खेळायचे आहेत, पण दिल्ली कॅम्पमधून अशा बातम्या येणे निश्चितच चिंतेची बाब आहे.
कोविड 19 महामारीमुळे, यावेळी आयपीएलचे लीग सामने महाराष्ट्रात आयोजित केले जात आहेत. यामध्ये मुंबईतील तीन आणि पुण्यातील एका स्टेडियमचा समावेश आहे. यावेळी एकूण 70 लीग सामने आयोजित केले जाणार आहेत त्यानंतर प्लेऑफ सामने होतील ज्यासाठी कोलकाता आणि अहमदाबादची निवड करण्यात आली आहे. अंतिम सामना अहमदाबादमध्ये 29 मे रोजी होणार आहे. आयपीएल सुरू होत असताना देशातील कोविड साथीची परिस्थिती नियंत्रणात होती आणि त्यामुळे स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांनाही परवानगी देण्यात आली होती, मात्र आता पुन्हा कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.