मुंबई : आयपीएल 2022 मध्ये तीन सामने खेळलेल्या राजस्थान रॉयल्सला स्पर्धेच्या मध्यात मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईल हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. कुल्टर-नाईल संघातून बाहेर पडणे हा संजू सॅमसनसाठी मोठा धक्का आहे कारण, तो बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीत माहीर आहे.
मात्र, राजस्थानने अद्याप कुल्टर नाईलच्या बदलीची घोषणा केलेली नाही. अशा स्थितीत कुल्टर नाईलच्या जागी राजस्थानचा कोणता खेळाडू सामील होतो, या घोषणेवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. आयपीएल मेगा ऑक्शन 2022 मध्ये राजस्थानने कुल्टर नाईलला दोन कोटी रुपयांना विकत घेतले होते.
राजस्थानच्या चालू मोसमातील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली या संघाने चांगली सुरुवात केली आहे. पॉइंट टेबलमध्ये राजस्थानचा संघ 3 सामन्यांत दोन विजय आणि एक पराभवासह पहिल्या स्थानावर आहे. या हंगामात राजस्थानचा संघ फलंदाजी असो की गोलंदाजी दोन्हीत धोकादायक दिसत आहे.
राजस्थानच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये जोस बटलरने चमकदार कामगिरी केली आहे. तर देवदत्त पडकल आणि कर्णधार संजू सॅमसनही फॉर्ममध्ये दिसले. याशिवाय गोलंदाजीचा विचार करता या संघाचे आक्रमण हे स्पर्धेतील सर्वात धोकादायक गोलंदाजी आक्रमण असल्याचे दिसते आहे. या संघाच्या गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांसारखे हुशार गोलंदाज आहेत.