
नवी दिल्ली : आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. IPL 2022, 26 मार्चपासून सुरू होत आहे, मात्र त्याआधी पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा एक स्टार खेळाडू आरसीबीसोबतच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.
घातक गोलंदाज कागिसो रबाडा पंजाब किंग्ज संघात सामील झाला आहे, मात्र त्याचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेला नाही. आणि त्यामुळे हा खेळाडू आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. अशा स्थितीत पंजाब किंग्जसाठी हा धक्का असेल. कारण, रबाडा अत्यंत घातक गोलंदाजांपैकी एक आहे. तो नेहमीच आपल्या गोलंदाजीने विरोधी संघातील फलंदाजांमध्ये दहशत निर्माण करतो.
पंजाब किंग्जच्या वेगवान गोलंदाजीत कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग आणि ऋषी धवन यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे फिरकी विभागात राहुल चहर आहे. अशा स्थितीत आरसीबीविरुद्ध २७ मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यात कागिसो रबाडाची अनुपस्थिती हा संघासाठी मोठा धक्का आहे. रबाडाची चार षटके खेळणे कुणासाठीही सोपे नाही. गेल्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफपर्यंतचा प्रवास केला होता. यात कागिसो रबाडाची मोठी भूमिका होती. त्याने आयपीएलच्या 50 सामन्यांमध्ये 76 विकेट घेतल्या आहेत. जेव्हा तो आपल्या लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही फलंदाजीचा क्रम मोडून काढू शकतो.