मुंबई : आयपीएल (IPL 2022) च्या 15 व्या मोसमात, दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात त्यांनी पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा पराभव केला. दिल्लीने 178 धावांचे लक्ष्य 18.2 षटकांत पूर्ण केले. मात्र, या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सला एक वाईट बातमी मिळाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा एक खेळाडू जखमी झाला आहे. अष्टपैलू मिचेल मार्श हिपच्या दुखापतीने त्रस्त असून तो पाकिस्तानविरुद्धची वनडे आणि टी-२० मालिका खेळणार नसल्याचे बोलले जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने मिचेल मार्शच्या दुखापतीबाबत माहिती दिली.
अॅरॉन फिंच म्हणाला, ‘मिचेल मार्शला हिपला दुखापत झाली आहे आणि त्याला ज्याप्रकारे वेदना होत आहेत, त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळेल असे वाटत नाही.’ यामुळे कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे कारण हा खेळाडू या फ्रँचायझीचा महत्त्वाचा खेळाडू आहे.
मिचेल मार्शला दिल्ली कॅपिटल्सने 6.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. या खेळाडूचा उत्कृष्ट फॉर्म पाहून दिल्लीने त्याच्यावर सट्टा लावला होता, मात्र आता मार्शच्या दुखापतीमुळे दिल्लीला टेन्शन आले आहे. मिचेल मार्शला बरा होण्यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप समजलेले नाही.त्याला ज्या प्रकारची दुखापत झाली आहे, त्याला सावरण्यासाठी किमान २ ते ३ आठवडे लागतील. असे झाल्यास मिचेल मार्श दिल्ली कॅपिटल्ससाठी निम्म्याहून अधिक सामने खेळू शकणार नाही.