
मुंबई : आयपीएलच्या 15व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श दुखापतीमुळे आयपीएल 2022 चा एकही सामना खेळलेला नाही. तो अजूनही आयपीएलच्या पुढील 3-4 सामन्यांना उपस्थित राहणार नाही. मिशेल मार्शला दिल्ली कॅपिटल्सने (DC) 6.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
मिचेल मार्श गेल्या महिन्यात पाकिस्तानविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत आपल्या देशाचे कर्णधारपद भूषवताना दुखापतग्रस्त झाला होता. सुरुवातीला तो डीसीकडून खेळेल अशी अपेक्षा होती. पण डीसीने त्याला संघात न घेण्याचा आणि त्याच्या पर्यायाचा विचार केला. डीसीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी 10 एप्रिल रोजी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मार्शच्या पुनरागमनाबद्दल सांगितले होते.
‘द टेलिग्राफ’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्शचा त्रास आणखी वाढला आहे, तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याला पुढील दोन-तीन सामन्यांना मुकावे लागणार आहे.
दिल्लीचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध शनिवार, 16 एप्रिल रोजी आहे, मार्चचा खेळ जवळजवळ पूर्ण झाला आहे. यासोबतच हा खेळाडू पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पुढील दोन सामन्यांनाही मुकण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मिचेल मार्श 28 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातून परतणार आहे.