नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2022, 26 मार्चपासून सुरू होणार आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंची यो-यो चाचणी घेतली होती. यात दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ही चाचणी उत्तीर्ण होऊ शकला नाही. तर गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या टेस्टमध्ये पास झाला आहे.
चाचणीत नापास झाल्यानंतर पृथ्वी शॉ सोशल मीडियावर ट्रेंड झाला. काहींनी त्याला ट्रोल केले, तर काहीजण ही बातमी शेअर करताना दिसले. या बातम्यांना कंटाळून टीम इंडियाच्या युवा सलामीवीराने एक पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पृथ्वी शॉने म्हणाल, माझी बाजू समजून घेतल्याशिवाय यावर काही बोलू नका. इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना पृथ्वी शॉने लिहिले, “तुम्हाला माझी स्थिती माहीत नाही. त्यामुळे कृपया यावर बोलू नका. तुम्ही तुमचे काम करत राहा.”
यो-यो चाचणी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे झाली. बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ही यो-यो चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. पृथ्वी शॉसाठी चांगली गोष्ट म्हणजे तो बीसीसीआयच्या करार यादीत नसल्यामुळे तो अपयशी ठरल्यानंतरही आयपीएल खेळू शकणार आहे.