Olive tree
Olive tree

वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. ज्यामध्ये मधुमेह, थकवा, अशक्तपणा. या सर्वांशिवाय गुडघेदुखी (Knee pain) ही देखील एक अशी समस्या आहे, जी वाढत्या वयाबरोबर वाढते. आज तरुणांमध्ये चुकीची बसण्याची मुद्रा, सांधेदुखी, बर्सायटिस, लठ्ठपणा, फ्रॅक्चर आदींमुळे गुडघेदुखीची समस्याही दिसून येत आहे. गुडघेदुखी कमी करण्यासाठी लोक विविध उपाय करतात. पण अनेक वेळा त्याचा काही परिणाम होत नाही. काही शासत्रज्ञांनी संशोधन केले असता त्यांना आढळून आले की, ऑलिव्ह (Olive) झाडाच्या पानांचा अर्क गुडघेदुखीमध्ये खूप आराम देतो.

काय सांगते संशोधन –
हे संशोधन स्विस शास्त्रज्ञांनी केले आहे. या संशोधनात असे आढळून आले आहे की, ऑलिव्ह झाडाच्या पानांचा अर्क वेदनाशामक म्हणून काम करू शकतो. ऑलिव्हच्या झाडाच्या पातळ आणि सरळ पानांमध्ये खूप चांगली संयुगे आढळतात, ज्याला पॉलिफेनॉल (Polyphenols) म्हणतात.

या झाडाच्या पानाचे दाहक-विरोधी प्रभाव असतात आणि हे तीव्र सांधेदुखी (Joint pain) असलेल्या रुग्णांना जळजळ कमी करण्यास मदत करतात. तसेच या संशोधनामध्ये असे आढळून आले कि, ऑलिव्ह ऑइल कोरोनरी चरबीचे संचय कमी करून हृदयाचे रक्षण करते.

या व्यतिरिक्त हे स्तनाचा कर्करोग (Breast cancer), अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि अगदी नैराश्याचा धोका कमी करण्यास देखील मदत करू शकते.

124 लोकांवर केले संशोधन –
मस्कुलोस्केलेटल डिसीज जर्नल थेरप्युटिक ॲडव्हान्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात 55 आणि त्याहून अधिक वयाच्या 124 लोकांचा समावेश होता. या संशोधनाचे नेतृत्व स्विस अस्थी शास्त्रज्ञ मेरी-नोले होरकाजादा (Mary-Nole Horcazada) यांनी केले.

124 लोकांमध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघेही समान संख्येत होते आणि त्यापैकी अर्ध्याहून अधिक लोकांचे वजन जास्त होते. त्यापैकी 62 जणांना 125 मिग्रॅ ऑलिव्ह लीफ अर्क गोळ्याच्या स्वरूपात दिवसातून दोनदा देण्यात आला आणि अर्ध्याला प्लेसबो देण्यात आले.

6 महिन्यांनंतर गुडघा दुखापत आणि ऑस्टियोआर्थराइटिस आउटकम स्कोर (Osteoarthritis Outcome Score) च्या आधारावर त्यांच्या वेदनांची चाचणी घेण्यात आली. KOOS स्कोअर जितका जास्त असेल तितका त्रास कमी होईल असे त्यांनी सांगितले.

निष्कर्षांमध्ये असे आढळून आले की, ज्यांनी ऑलिव्हच्या पानांचा अर्क घेतला त्यांचा KOOS स्कोअर सुमारे 65 होता, तर ज्यांनी प्लासिबो ​​घेतला त्यांचा स्कोअर सुमारे 60 होता. संशोधकांच्या मते, आहारातील पूरक आहार गुडघेदुखी कमी करू शकतो.

प्राचीन ग्रीसपासून ऑलिव्हची पाने नैसर्गिक उपचारांमध्ये वापरली जात आहेत. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ते ऑलिव्हच्या पानांचा वापर करत असत. पण त्याचा अर्क घेणे तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.