ICC
ICC's big announcement for T20 World Cup 2024

मुंबई : रविवारी पार पडलेल्या आयसीसीच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी 19 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा प्रमुख होती. तसेच अध्यक्ष ग्रेग बार्कले त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, याचा अर्थ या पदासाठी पुढील निवडणूक डिसेंबरमध्येच होऊ शकते. ICC बोर्डाने पुष्टी केली आहे की दक्षिण आफ्रिका पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणार्‍या U-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करेल. ही स्पर्धा 16 संघांसोबत असणार असून यामध्ये एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. पुरुषांच्या टी-20 विश्वचषक 2024 मधील संघांच्या प्रवेशाबाबतही एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली.

2024 मध्ये होणाऱ्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषकात संघांच्या प्रवेशाबाबतची परिस्थिती स्पष्ट करताना 12 संघांना थेट प्रवेश मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 2022 टी-20 विश्वचषकातील अव्वल आठ संघांव्यतिरिक्त, वेस्ट इंडिज आणि यूएस यांना यजमान देश म्हणून प्रवेश मिळेल. याशिवाय 14 नोव्हेंबर 2022 पर्यंत रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थान मिळवणाऱ्या  दोन संघानाही निवडले जाईल.

आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “यंदाच्या विश्वचषकात वेस्ट इंडिज अव्वल आठमध्ये राहिल्यास. अव्वल तीन संघ निर्धारित वेळेत आयसीसी क्रमवारीच्या आधारे श्रेणी निश्चित करतील. या वर्षीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज अव्वल आठमध्ये प्रवेश करू शकला नाही, तर क्रमवारीतील अव्वल दोन संघ 2024 च्या आवृत्तीसाठी पात्र ठरतील.

2024 मध्ये होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकासाठीही अशीच पात्रता प्रक्रिया अवलंबली जाईल, ज्यामध्ये दहा संघांचा समावेश असेल. या स्पर्धेत आठ संघांना थेट प्रवेश मिळणार आहे. 2023 च्या दोन गटातील प्रत्येकी पहिल्या तीन संघांना प्रवेश मिळेल. यामध्ये दक्षिण आफ्रिकेला यजमान म्हणून प्रवेश मिळेल आणि क्रमवारीच्या आधारावर एका संघाला प्रवेश मिळेल.