
मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे, तसेच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी मोदींनी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना मोदी म्हणाले, “रविवारी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाचे मी अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छितो,”
34 वर्षानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिजचा पराभव करून येथे पोहोचला, तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे.
मेग लेनिंगच्या नेतृत्वाखाली संघ 7व्या विश्वचषकाच्या ट्रॉफीपासून फक्त एक पाऊल दूर उभा आहे. आतापर्यंत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला एकदाच पराभव पत्करावा लागला आहे. 2000 मध्ये झालेल्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडकडून 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
याआधी या विश्वचषकात भारताचा संघ अंतिम चारमध्ये स्थान मिळवू शकला नाही. विश्वचषकातील शेवटच्या साखळी सामन्यात भारताला विजयाची गरज होती पण दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने त्यांचा विश्वचषक प्रवास संपला. या विश्वचषकात भारताला केवळ तीन विजय मिळाले आहेत.