मुंबई : 2021 मध्ये मिस युनिव्हर्स बनून सर्वांची मने जिंकणारी हरनाज संधू अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत राहते. पण अलीकडेच ती तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. इतकंच नाही तर हरनाजच्या शरीरात झालेल्या बदलांमुळे लोक तिला खूप टार्गेट करत आहेत. दरम्यान नुकतंच हरनाझने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हरनाजला तिच्या वाढत्या वजनाबद्दल आणि त्यावरून ट्रोल करणाऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर हरनाझने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त केली. “मला ट्रोलिंगचा काहीही फरक पडत नाही. प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. मी माझ्या शरीराचा आदर करते. मला माझ्यावर लावण्यात येणारे आरोप पुसताही येतात. मी बॉडी शेमिंग करणाऱ्यांचा तिरस्कार करते”, असे हरनाझ म्हणाली.
पुढे ती म्हणाली की, “मला Celiac नावाचा आजार आहे. अनेक लोकांना माहिती नाही पण मला ग्लूटेनची अॅलर्जी आहे. ग्लूटेन म्हणजे प्रोलेमीन प्रोटीनचा एक भाग आहे. ग्लूटेन गहू, जव, तांदूळसारख्या पदार्थांमध्ये असतात. ग्लूटेन गरम झाल्यावर त्यातला चिकटपणा जास्त वाढतो. ग्लूटेनमुळे आरोग्याला नुकसान पोहचतं. हा आतड्यासंबंधीचा एक आजार आहे.”
“ज्या लोकांना ग्लूटेनची अॅलर्जी असते आणि त्यासोबतच ज्यांना Celiac आजार असतो, त्यांच्या शरीरात अन्न, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे शोषण होण्याचा त्रास होतो. या आजाराचा सामना करताना अनेकांच्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते. ग्लूटेनची अॅलर्जी असलेल्या लोकांना त्यांच्या वजनावर नियंत्रण ठेवणे फार कठीण जाते”, असे हरनाजने तिच्या वाढत्या वजनाचे कारण सांगितले.