अगस्ति कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाल्याची घटना अकोले तालुक्यातील राजूर जवळील कातळापूर शिवारात घटना घडली.

या अपघातात रामेश्वर साईदास राठोड (वय 21) (रा.पिशोर कोळंबी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद) याचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ऊसतोड कंत्राटदार शिवनारायण मगन राठोड (रा.कन्नड) यांचे कडे रामेश्वर राठोड हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता.

अगस्ति कारखाण्यावर ऊस खाली करून तो परत चालला होता. चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते.

अपघाताची माहिती मिळताच कारखान्याचे संचालक, मॅनेजर, कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा राजूर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत राजूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.