मुंबई : काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील हिजाब मुद्दाने देशभरात वादाचे वातावरण पसरले होते. हे प्रकरण मिटते का नाही की त्यानंतर आता ‘हलाल मीट’ मुद्द्यावरून नवा वाद सुरू झालेला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी यांनी हलालची तुलना ‘आर्थिक जिहाद’शी केली होती. ज्यावर आता प्रसिद्ध गायक लकी अली यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लकी अली यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, ‘प्रिय भारतीय बंधू आणि भगिनींनो, आशा आहे की तुम्ही सर्व ठीक असाल. मी तुम्हाला काही समजावून सांगू इच्छितो… ‘हलाल’ हे नक्कीच इस्लाम बाहेरील कोणत्याही व्यक्तीसाठी नाही. म्हणजेच जे इस्लाम धर्म मानत नाहीत किंवा पाळत नाहीत, त्यांच्यासाठी ‘हलाल’ ही गोष्ट नाही. त्याचं असं आहे की एखाद्या पदार्थामध्ये कोणत्या वस्तू वापरल्या गेल्या आहेत हे कळत नाही तोपर्यंत कोणताही मुस्लीम व्यक्ती त्याच्या यहूदी नातेवाईकांकडून कोणतेच पदार्थ विकत घेत नाही किंवा त्यात त्याच गोष्टी वापरल्या गेल्या आहेत, ज्याचा ते उपभोग घेऊ शकतात असेच पदार्थ ते विकत घेतात.’
‘मुस्लीम लोक ‘हलाल’ला कोशर प्रमाणे मानतात, जे यहूदी संस्कृतीत महत्त्वाचे मानले जाते. आता जर कंपन्यांना मुस्लिम आणि यहूदी लोकांना आपली उत्पादनं विकायची असतील तर त्यांना उत्पादनांवर हलाल प्रमाणित किंवा कोशर प्रमाणित असे लेबल लावावे लागेल. अन्यथा मुस्लिम आणि यहूदी त्यांच्याकडून कोणतेही खरेदी करू शकत नाहीत. पण ज्या लोकांना ‘हलाल’ या शब्दाशी समस्या असेल त्यांनी ते त्यांच्या काउंटरवरून हे शब्द काढून टाकावे पण यामुळे त्यांची विक्री पूर्वीसारखीच होईल याची शाश्वती नाही.’ असं म्हणत लकी अली यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ‘हलाल’ शब्दाचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.