नवी दिल्ली : यंदाची आयपीएल 26 मार्चपासून सुरू होत आहे, आयपीएल सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया लवकरच संघात पुनरागम करणार आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण आफ्रिकेचा हा गोलंदाज दिल्लीसाठी पहिले दोन सामने खेळू शकणार नाही.
एनरिक नॉर्खियाने आयपीएल 15 मध्ये सुरुवातीचे पहिले दोन सामने गमावल्यानंतर डीवाय पाटील स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात दिल्लीकडून खेळताना दिसेन. नॉर्खिया बऱ्याच दिवसांपासून हिपच्या दुखापतीमुळे त्रस्त होता, त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील खेळू शकला नव्हता.
मात्र, नॉर्खिया आता तंदुरुस्त असल्याची बातमी दिल्ली कॅपिटल्ससाठी खूप सकारात्मक आणि दिलासा देणारी असेल, कारण यावर्षी हा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहे. एनरिक नॉर्खियाला दिल्ली कॅपिटल्स संघाने मेगा लिलावापूर्वी ६.५ कोटी रुपयांना कायम ठेवले होते आणि आता तो मुंबईत पोहोचला आहे आणि सध्या क्वारंटाईनमध्ये आहे.
आयपीएल दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी कसोटी मालिकेपेक्षा जास्त आयपीएलमध्ये फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. नॉर्खिया दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेट खेळत नव्हता, पण आता तो फिट दिसत असून तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.