मुंबई : यंदाची आयपीएल २६ मार्चपासून सुरू होत आहे. या मोसमातील सलामीचा सामना सीएसके आणि केकेआर यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी, चेन्नईच्या कॅम्पमधून चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ज्यामुळे सीएसकेलाही मोठा दिलासा मिळाला आहे.
संघाचा स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाड केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून आता तो पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. गायकवाडच्या फिटनेसची माहिती संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनीच दिली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, “ऋतुराज गायकवाड आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो सुरतमध्ये संघासोबत सराव करत आहे.” पुढे बोलताना त्यांनी असेही सांगितले की हा सलामीवीर KKR विरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.
ऋतुराज गायकवाडने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे आणि आता तो सीएसकेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट होण्यासाठी उपलब्ध असेल. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत गायकवाडला दुखापत झाली होती, त्यानंतर तो उपचार घेत होता. ऋतुराजचे तंदुरुस्त असणे संघासाठी खूप महत्वाचे होते, कारण संघाचा स्टार अष्टपैलू मोईन अली आतापर्यंत संघात सामील होऊ शकला नाही, तर वेगवान गोलंदाज दीपक चहर देखील दुखापतीमुळे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील CSK संघाने आतापर्यंत चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे, तर यावेळी संघाची नजर पाचव्यांदा विजेतेपद पटकावून मुंबई इंडियन्सशी बरोबरी करण्यावर असेल.